औरंगाबाद: अभूतपूर्व कचराकोंडीने राज्यभर गाजलेल्या औरंगाबाद शहरात काल डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान राबविले. तब्बल 25 हजाराहून अधिक सेवावृत्तीनी शहर चकाचक करीत शहरवासीयांच्या परावलंबी मानसिकतेवरच जोरदार प्रहार केला. त्यामुळे शहरवासीयांचे डोळे आता तरी उघडतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरकारी मदत अन अनुदान यावरच आपला उदरनिर्वाह चालावा, असे पराकोटीचे परावलंबित्व सर्वत्र निर्माण झालेले आहे. सरकार म्हणजे सर्व सुविधा देणारी यंत्रणा असाही समज होऊन बसला आहे. खरेतर अशी मानसिकताच निर्माण होणे समाजासाठी अन राष्ट्रासाठी घातकच आहे. शहरातील कचरा कोंडीने नरकयातना अनुभवलेल्या शहरवासीयांचे डोळे अजूनही उघडायला तयार नाही. स्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे भान अजूनही आलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे, उघड्यावर शौचास जाणे, त्याच बरोबर ठिकाणी जागा मिळेल तिथे पिचकाऱ्या मारण्याचे उद्योग काही केल्या बंद होत नाहीत. शहराच्या स्वच्छतेसाठी सरकारी यंत्रणा कोट्यवधी रुपये खर्च करते. असंख्य कर्मचारी राब राब राबतात त्यांना थोडेसे सहकार्य केले तर शहराची स्थिती नक्कीच बदलेल, यात शंका नाही. मात्र आपली मानसिकताच अजून बदललेली नाही. मोकळी मैदाने, मोकळ्या जागा, कोपरे घाण करण्यासाठीच असतात असा पक्का समज आपला झाला आहे. हा समज दूर करून स्वच्छतेचे महत्व जाणले तर धर्माधिकारी प्रतिष्ठान सारख्या सेवाव्रतीना शहरात घेऊन आपला कचरा साफ करण्याची वेळ येणारच नाही. खरेतर शहरातील सामाजिक संघटना, संस्था तसेच समाजसेवकांनी रस्त्यावर उतरून शहर स्वच्छ करणे गरजेचे होते. मात्र राजकारणाने शहराच्या स्वच्छतेचे मातेरे केले. त्यामुळे प्रत्येकाने सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहण्याचे धोरण राबविले. याचा फटका शहराच्या प्रतिमेला बसला आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 25 हजाराहून अधिक सेवावृत्तीने शहराचा कानाकोपरा साफ केला तरी शहरवासीयांची मने स्वच्छ करावी कुणी ? असाही सवाल उपस्थित होत आहे. सेवाव्रती नेहमी येणार नाहीत शहर स्वच्छ राखणे आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने या स्वच्छतेत खारीचा वाटा उचलायला हवा. तरच शहराचे आरोग्य आणि प्रतिमा सुधारेल यात शंका नाही.
कोट्यवधींचा खर्च
शहरात स्वच्छता आणि कचऱ्याची विल्हेवाट यासाठी महानगरपालिका सह इतर यंत्रणा कोट्यवधींचा खर्च करतात. सामाजिक संघटना अथवा संस्थांनी कचरा प्रक्रिया करणारी छोटी यंत्रे शहरात बसवली तर त्याचा मोठा लाभ होईल. त्याचबरोबर वायफळ खर्चही वाचेल. सोलार यंत्रणा, छतावरचे पाणी बोरमध्ये टाकणे अशा छोट्या छोट्या उपाययोजनाही शहराचे आरोग्य सुधारण्यासाठी कारणीभूत ठरतील. प्लास्टिकचा वापर कमी करणे, नैसर्गिक प्रवाहांची स्वच्छता करणे अशा उपाययोजनाही सामाजिक संघटनांनी हाती घेण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी शहर स्वच्छ होणे आवश्यक आहे नसता साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे.